नवी दिल्ली : नीट २०२६ पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. याशिवाय, ३० जूनपर्यंत टेलिग्रामवरील मेसेज एडिट करण्याच्या सुविधेवरही मर्यादा आणण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने या निर्णयाचे स्वागत केले असून, गेल्या काही काळात टेलिग्रामचा वापर करून काही टोळ्या नीट उमेदवारांची दिशाभूल करत असल्याचा दावा केला आहे. पेपर लीक झाल्याचे खोटे दावे, बनावट प्रश्नपत्रिका आणि पुनर्परीक्षेबाबत चुकीची माहिती पसरवून विद्यार्थ्यांकडून हजारो ते लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्या चॅनेल्सवर कारवाई
इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने एनटीए आणि विविध राज्यांच्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक टेलिग्राम चॅनेल्स, ग्रुप्स आणि बॉट्सविरोधात कारवाई केली आहे. मात्र, स्वतंत्रपणे चॅनेल्स बंद करूनही गैरप्रकार पूर्णपणे थांबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर प्लॅटफॉर्म स्तरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
एडिट फीचरमुळे तयार होत होते दिशाभूल करणारे पुरावे
एनटीएच्या म्हणण्यानुसार, टेलिग्राममधील एडिट फीचरचा गैरवापर होत होता. काही अॅडमिन जुन्या फाईल्स बदलून त्याजागी नवीन फाईल्स अपलोड करत होते. मात्र, मूळ टाइमस्टॅम्प कायम राहत असल्याने परीक्षा झाल्यानंतरही प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध होती असा भास निर्माण केला जात होता. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार होत होते.
रि-एग्जाममच्या नावाखाली लाखोंची मागणी
तपासादरम्यान पेपर लीक, नीट री-एग्जाम २०२६ अशा नावांची अनेक चॅनेल्स आढळून आली. या माध्यमांतून विद्यार्थ्यांना कथित प्रश्नपत्रिका किंवा विशेष माहिती देण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा मागितल्या जात असल्याचा आरोप आहे. अनेक विद्यार्थी या जाळ्यात अडकत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली.
विद्यार्थ्यांना एनटीएचे आवाहन
या निर्बंधांचा परिणाम काही प्रमाणात सर्वसामान्य वापरकर्त्यांवरही होणार असल्याची कबुली एनटीएने दिली आहे. मात्र, हा निर्णय केवळ परीक्षेच्या संवेदनशील कालावधीपुरता असून परीक्षेची निष्पक्षता जपणे हेच त्यामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २१ जून २०२६ रोजी होणारी नीट पुनर्परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे एनटीएने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरील अफवा किंवा अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करून केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.